विद्याभारती संस्थेशी संलग्न असलेली शिक्षण संस्था पंचकोशाधारीत गुरुकुल ;घरकुल हेच गुरुकुल या प्रयोगांतर्गत आज दि.१८ ऑगस्ट २०२० रोजी अर्थात श्रावण कृ.चतुर्दशी रोजी मातृदिनाचा परमपावन दिवस मातृदिन साजरा करण्यांत आला
आपल्या जीवनात मातृभाषा व मातृभूमी इतकंच मातृ-पितृ दैवत महत्वाचं आहे.आपणही आपल्या मातेला औक्षणासह वंदन करण्याचा व तिच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.आपल्या गुरुकुलाच्या परंपरेला साजेसा असा हा दिवस घरोघरी आज साजरा करण्यांत आला.
सर्व विद्यार्थ्यांनी आज पहाटे उठून शुचिर्भूत होऊन देवपूजेइतक्याच तल्लीनतेने आईला उच्चासनावर बसवून आपल्या भावंडासह तिच्या चरणांना स्पर्श करून आपले पंचप्राण अर्थात पंच ज्योतीने तिचे औक्षण केले.तिला गोड घास भरवला व तिचा आशीर्वाद घेतला.
तदनंतर काहीजणांनी स्वतः तयार केलेली किंवा अन्य पुस्तकातील आई वरील एक छोटीशी,छानशी कविता वाचली आणि मनोगत व्यक्त केले.अतिशय भावपूर्ण आणि मनस्वी आनंद देणारा हा मातृदिन आज साजरा झाला.