३ जानेवारी... क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, हा दिवस 'बालिका दिन' किंवा 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल शिरळ, चिपळूण येथील शिक्षकांनी वर्षी कोविड महामारीच्या काळात जनजीवन सुरळीत चालण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावत ज्या महिलांनी समाजसेवा केली त्यांचा या कामगिरी बद्दल गौरव करावा, असे ठरविले. संस्थाचालकांनीही याला मान्यता देत संस्थेतर्फे गौरव करावा असे निश्चित केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती वंदनेने करण्यात आली. प्रास्ताविक सौ. पुर्वा खरे यांनी केले. गौरवमूर्तींचा परिचय श्री. गजानन गुणिजन यांनी केले. सदर कार्यक्रम संघ कार्यालय, माधवबाग, चिपळूण येथे हा संपन्न झाला. या वेळी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सौ. शरयू गणेश पाटील, सैनिक हॉस्पिटलच्या मेडीकल ऑफिसर डॉ. सौ. अश्विनी तेजानंद गणपत्ये, लाईफकेअर हॉस्पिटलच्या आहार तज्ज्ञ सौ. मृण्मयी ओंकार बापट , चिपळूण पोलीस ठाण्याच्या हेडकॉन्स्टेबल सौ. रमा करमरकर, खेर्डीच्या आशा गटप्रवर्तक सौ. जाबरे, बॅंक ऑफ महाराष्ट्र, चिपळूण शाखेच्या सौ. वंदना माधव परांजपे, दंतचिकित्सक डॉ. सौ. प्राजक्ता शेखर मेहेंदळे या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमाला प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक श्री. सुधीर भागवत प्रमुख पाहुणे तर विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल समिती चे अध्यक्ष एअर मार्शल (रि.) हेमंत भागवत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
"पुर्वी नाटकात स्त्रियांनी काम केल्यामुळे समाजाचं अध:पतन झाल्याचं मानणारी पिढी ते आज स्त्रियांच्या कार्याचा सत्कार करण्याची मानसिकता हा बदल" प्रमुख पाहुणे श्री. भागवत यांनी अधोरेखित करुन संस्थेच्या कार्यास व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष डॉ. जयंत मेहेंदळे, विद्याभारती जिल्हाध्यक्षा प्रा. सौ. सोनाली खर्चे, संस्था कार्यवाह सौ छाया मुसळे, संस्था पदाधिकारी श्री. माधव परांजपे, श्री. सुरेश कशेळकर, श्री. दिलीप साठे, श्री. शरद मुसळे, सौ. उषा खरे व प्रकल्प संयोजक श्री. प्रसाद सनगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जान्हवी टाकळे यांनी केले तर आभारप्रदर्शन पूर्वा केळकर यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप शांतीमंत्राने झाला.